लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या बहुचर्चित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट-४) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. आॅनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयानंतर दोन दिवसांवर परीक्षा आलेली असताना निगेटिव्ह गुणांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. याविषयी प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.विद्यापीठाच्या पेट-४ परीक्षेसाठी १३ हजार ५०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा १४ व १५ जुलै रोजी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील १७ केंद्रांवर तीन सत्रांत होणार आहे. यासाठी जिल्हानिहाय अधिष्ठातांची पेट समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या नेतृत्वात कोणत्याही विद्यार्थ्याला हॉल तिकीट, परीक्षा केंद्र, नावात बदलासह काही अडचणी निर्माण झाल्यास, त्या सोडविण्यासाठी विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात मदतकेंद्र स्थापन केले आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात १३ आणि बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन परीक्षा केंद्रे ठेवण्यात आली आहेत. मात्र, परीक्षा दोन दिवसांवर आलेली असताना ऐनवेळी ‘पेट’ परीक्षेचे गुणांकन निगेटिव्ह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयानुसार परीक्षार्थीचे चार प्रश्न चुकल्यास एक बरोबर उत्तर कमी होणार आहे. एका चुकीच्या प्रश्नाला पाव टक्का गुण कमी होणार आहेत. या निर्णयाची माहिती विद्यापीठ प्रशासानाने बुधवारी आॅनलाइन दिली असल्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही. या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. सरवदे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. दिलीप खैरनार, डॉ. संजय साळुंके, प्राचार्य मजहर फारुकी, उपकुलचिव संजय कवडे आदी या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.
‘पेट’ला निगेटिव्ह गुणांचा निर्णय
By admin | Updated: July 13, 2017 01:04 IST