औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जानेवारी अखेरपर्यंत पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) घेण्याची तयारी सुरू केली असून मार्गदर्शकांकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या जेवढ्या जागा रिक्त आहेत, तेवढ्याच जागांसाठी ‘पेट’ घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मागील चार वर्षांपूर्वी चौथी ‘पेट’ झाली होती. त्यानंतर आजवर ‘पेट’ घेण्यासाठी विद्यापीठाला मुहूर्त सापडला नाही. तथापि, विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नवीन वर्षात पाचवी ‘पेट’ घेऊन त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये पीएच.डी. संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारे मान्यता प्राध्यापक आहेत व तेथे संशोधन केंद्र आहे, अशाच महाविद्यालयातील मार्गदर्शकांकडे विद्यार्थ्यांना संशोधनाची परवानगी असेल. या अध्यादेशामध्ये लवचिकता आणण्यासाठी कुलगुरुंनी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून येत्या ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम बैठकीत विद्यार्थीहिताचे निर्णय घेतले जाणार आहेत.
डिसेंबर अखेरपर्यंत सर्व विद्याशाखांच्या संशोधन अधिमान्यता समितीच्या (आरआरसी) बैठका घेऊन पीएच.डी.च्या रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार विद्यापीठ व महाविद्यालयीन मार्गदर्शकांकडे संशोधनासाठी रिक्त जागांची माहिती समोर येईल व विषयांनुसार रिक्त जागांसाठीच पेट घेतली जाईल. विद्यापीठात काही असेही विषय आहेत. त्याविषयांत विद्यार्थी संशोधन करण्यास इच्छुक आहेत; पण त्या विषयांसाठी पूर्णवेळ प्राध्यापक नाहीत. काही विषयांसाठी मार्गदर्शकही नाहीत, असे विषय ‘पेट’मधून वगळण्यासाठीही या बैठकीत चर्चा झाली.
चौकट........
२० डिसेंबरपर्यंत अधिसूचना निघेल
यासंदर्भात प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, जानेवारीअखेरपर्यंत ‘पेट’ घेतली जाईल. तत्पूर्वी, विषयनिहाय संशोधक विद्यार्थी व मार्गदर्शकांची उपलब्धता यांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर साधारणपणे २० डिसेंबरपर्यंत ‘पेट’ बाबत अधिसूचना जाहीर केली जाईल. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महिनाभराचा अवधी द्यावा लागतो. त्यानंतर ती परीक्षा घेण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.