लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरात पावसामुळे सखल भागात निर्माण होणाºया पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या हालचालींना प्रारंभ झाला असून शहरातील प्रमुख तीन समस्याग्रस्त भागात विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आयएलएफएस या संस्थेला महापालिकेने दिल्या आहेत.शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण शहर जलमय झाले होते. इतकेच नव्हे, तर प्रशासकीय अधिकाºयांच्या निवासस्थानीही पाणी साचले होते. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. तर दुसरीकडे शहरातील श्रावस्तीनगर, पांडुरंगनगर तसेच जुन्या नांदेडातील काही भागात नेहमीच नागरी वस्तीमध्ये पाणी शिरते.या भागातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरू केले आहेत. याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले, आयएलएफएस या सल्लागार संस्थेला श्रावस्तीनगर, पांडुरंगनगर, जुने नांदेड या ठिकाणच्या पाणी निचºयासाठी डीपीआर अर्थात विकास आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. श्रावस्तीनगरात गोदावरी नदीचे पाणी शिरते. हे पाणी योग्य मार्गाने काढून दिले जाणार आहे. हे करताना रेल्वेच्या जागेतूनही एक नाला काढावा लागणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार असल्याचे देशमुख म्हणाले.जुन्या नांदेडातील मालटेकडी भागातही पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, तो सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. येथेही मालटेकडी रेल्वेस्थानकाचा काही भाग पाण्यामुळे प्रभावित होतो. त्यामुळे येथेही रेल्वे अधिकाºयांशी चर्चा केली जाईल. वसंतनगर, बाबानगर, मगनपुरा, आनंदनगर आदी भागांतील पाणी निघण्याचा मार्गही वखार महामंडळाच्या जागेतून काढावा लागणार आहे. यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
पाणी निचºयासाठी कायमस्वरूपी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:24 IST