अंबड : मराठवाड्याला काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळाच्या कायमस्वरुपी निवारणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नातून कायमस्वरुपी उपाययोजना राबवावी, असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी सोमवारी अंबड येथे व्यक्त केले. अंबड तालुक्यातील विविध गावांतील दुष्काळी भागाची त्यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मानसिक आधार देण्यासासह आर्थिक मदत दिली.उद्योजक शरद गायकवाड, संजय गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले दीर्घ कालीन उपाययोजना राबवून छत्रपती शाहू महाराजांनी कामयस्वरुपी दुष्कळमुक्त केल्याचे आठवण त्यांनी सांगितली. शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती जाणून घेणार आहोत. संपूर्ण दौरा झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायमस्वरुपी उपाययोजनांचा आग्रह धरणार असल्याचे नमूद केले. हा पर्याय नाही. सामूहिक प्रयत्नातूनच मार्ग सापडेल असा विश्वास व्यक्त करीत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अभिनेते नाना पाटेकर, मकरंद आनासपुरे यांच्यासह पुणे येथील अमोल बालवडकर, परतूर येथील कर्तव्य फाऊंडेशनेही मोठी मदत शेतकऱ्यांना दिल्याचे सांगितले. याप्रसंगी तालुक्यातील १३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना ८० हजार रुपयांची मदत दिली.यावेळी छावाचे अप्पासाहेब कुढेकर, संभाजी ब्रिगेडचे संतोष जेधे, योगेश पवार, भगवान गायकवाड, शरद गायकवाड, गणेश बोर्डे, दीपक लोहकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.अंबड तालुक्यातील माळेवाडी, किनगाव, अंबड, झिरपी, भारडी, जोगलादेवी, गोंदी, महाकाळा आदी गावांतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची छत्रपती संभाजी राजे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आर्थिक मदतही दिली. खचून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचा धीर दिला. (वार्ताहर)
दुष्काळ निवारणार्थ कायमस्वरुपी उपाययोजना करा- संभाजी राजे
By admin | Updated: September 16, 2015 00:30 IST