पाटोदा : मग्रारोहयोच्या कामामध्ये अधिकाऱ्यांचीही टक्केवारी आहे. चार टक्क्यांप्रमाणे पैसे घेतल्याशिवाय अधिकारी बिले काढत नाहीत, असा खळबळजनक आरोप आ. भीमराव धोंडे यांनी केला. येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये शनिवारी आयोजित आमसभेत आ. धोंडे यांनी हे विधान केले. तब्बल पाच वर्षांनंतर आयोजित केलेल्या आमसभेत २८ गावांचा आढावा घेण्यात आला. पाणी, विकास कामातील गैरव्यवहार, रखडलेली मग्रारोहयोची कामे, पीक विम्याचे अडकलेले पैसे, भरपाईपासून वंचित राहिलेले शेतकरी असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले. समारोपाच्या भाषणात आ. धोंडे यांनी मग्रारोहयोचे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांना लक्ष्य केले. पैशाशिवाय काम नाही, केवळ अडवणूक करायची आणि कामे रखडत ठेवायची, असा थेट निशाणा धोंडे यांनी साधला. आमसभेला वनाधिकारी एस. आर. काळे गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला. सभापती अनिल जायभाये, तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी चंद्रशेखर केकान, निरीक्षक एस. बी. हुंबे उपस्थित होते. (वार्ताहर)
मग्रारोहयोत अधिकाऱ्यांची टक्केवारी !
By admin | Updated: March 15, 2015 00:17 IST