औरंगाबाद : मराठवाडा सार्वजनिक बांधकाम विभागातील काही महाभाग २५ ते ३० टक्के घेतल्याशिवाय बिले देत नसल्यामुळे पूर्ण विभाग ‘टक्के’ बहाद्दरांच्या विळख्यात अडकला आहे. विभागाच्या खाबूगिरीमुळे रस्त्यांची कामे निकृष्ट होत असून, शासनाची नाचक्की होत आहे. टक्केवारीचा जनक कोण, याची गुप्त चौकशी करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यासाठी एक गोपनीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात झालेल्या एका बैठकीत ५ डिसेंबर रोजी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमक्ष कंत्राटदारांनी अभियंते २५ ते ३० टक्के घेऊन बिले देत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. ही टक्केवारी कोणते अभियंते घेत आहेत, याचे नाव बैठकीत कंत्राटदारांनी सांगितले नव्हते. अतिरिक्त सचिव ए. बी. कुलकर्णी यांनी मराठवाडा, विदर्भातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दौरे केले. त्या दौऱ्यादरम्यान त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी, कंत्राटदारांनी तक्रारी केल्या होत्या. ५ डिसेंबर रोजी बांधकाम मंत्र्यांसमक्ष कंत्राटदार संघटनेचे खुशबीरसिंग बिंद्रा, मुश्ताक अहेमद, सचिन संचेती आदींनी विभागातील टक्केवारी कशी वाढत आहे, याबाबत गाऱ्हाणे मांडले. परंतु त्यांनी कोणत्याही अभियंत्याचे नाव सांगितले नव्हते. मात्र, बैठकीनंतर विभागाचे कार्यकारी अभियंता पी. आय. सुखदेवे यांची तडकाफडकी मुंबईला बदली करण्याचे आदेश सचिवांनी काढले होते. परंतु टक्केवारी घेणाऱ्यांचे त्यामुळे फावल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे या प्रकरणात नेमके कोणते महाभाग आहेत, हे समोर असणे गरजेचे असल्यामुळे एक गोपनीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीला टक्केबहाद्दरांची माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
टक्केवारी घेणाऱ्याची चौकशी
By admin | Updated: December 14, 2015 23:59 IST