लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य राहावे, या उदात्त हेतूने रविवारी सकाळी जमियत उलेमा हिंद बीड शाखेच्या वतीने शहरातून शांती मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मार्चमध्ये देण्यात आलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले.देशात विविध जातिधर्माचे लोक राहतात. विविध भाषा बोलल्या जातात. भारतासारखा देश जगाच्या कुठल्याही पातळीवर दिसणार नाही; मात्र मागील काही दिवसांपासून जातिवादी लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांना पायबंद घालण्यास केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप मार्चमधील लोकांनी केला.देशात शांतता प्रस्थापित करण्यात यावी यासाठी हा शांती मार्च बीडमध्ये काढल्याचे त्यांनी सांगितले. बार्शी नाका येथून निघालेला हा मार्च छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड मार्गे जि.प. कन्या शाळेत पोहोचला. येथे मार्चचा समारोप झाला. ‘प्यार-मोहब्बत झिंदाबाद, फिरका परस्ती मुर्दाबाद’ यासारखी फलके मार्चमधील लोकांच्या हाती होती.तसेच रॅलीच्या समोर तिरंगा झेंडा फडकत होता. शांतता व शिस्तीचे या रॅलीमधून सर्वांना दर्शन घडले. रॅली आकर्षक ठरली.
सामाजिक ऐक्यासाठी शांती मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:06 IST