कडा : आष्टी तालुक्यातील कडा - लिंबोडी - पाटण या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून पुलावरील नळ्याही फुटल्या आहेत. यामुळे रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करुनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने ग्रामस्थांमधून आता संताप व्यक्त केला जात आहे.कडा - लिंबोडी - पाटण हा रस्ता बारा किलोमीटरचा आहे. पाटण, लिंबोडीसह परिसरातील ग्रामस्थ दररोज विविध कामांसाठी कडा येथे येतात. तसेच कडा येथे शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर सोय असल्याने विद्यार्थी - विद्यार्थिनी येथे ये-जा करतात. लिंबोडी, पाटणसह परिसरातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी कडा येथे आणतात. परिसरातील २० हजार पेक्षा अधिक लोकसंख्येचे व्यावसायिक संबंध कडा शहराशी आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना सातत्याने कडा येथे ये-जा करावी लागते. असे असले तरी गेल्या तीन वर्षापासून कडा - लिंबोडी - पाटण या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत.लिंबोडी, पाटण परिसरातील रुग्णांना रात्री-अपरात्री कडा, अहमदनगर, आष्टी आदी ठिकाणी रुग्णालयात जावे लागते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने रुग्णांना अधिकच हाल सहन करावे लागतात.या रस्त्यादरम्यान तीन ते चार ठिकाणी नळकांडी पूल आहेत. या पुलांवरुन जड वाहने गेल्याने पुलातील नळ्या फुटल्या आहेत. यामुळे पुलाला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. रात्रीच्या वेळी पुलावरील फुटलेल्या नळ्या चालकांना दिसून येत नाहीत. यामुळे काही पुलांवर रात्रीच्या वेळी वाहने खड्ड्यात अडकल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांसह फुटलेल्या नळ्यांमुळे ग्रामस्थांना मोठे हाल सहन करावे लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप यांनी सांगितले. पुलावरील खड्डे ग्रामस्थांसाठी जीवघेणे ठरत असल्याने तात्काळ दुरुस्तीची मागणीही त्यांनी केली आहे.रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाल्याने एस. टी. महामंडळाने बसच्या फेऱ्याही बंद केल्या आहेत. परिणामी येथील विद्यार्थ्यांना आर्थिक झळ सहन करुन स्वत:च्या किंवा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने शाळा-महाविद्यालयामध्ये ये-जा करावी लागत आहे. खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असल्याने रस्ते दुरुस्तीची मागणी संजय खंडागळे, बाळासाहेब जगताप आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करूकडा-लिंबोडी-पाटण या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात सा. बां. चे उप अभियंता सुंदर पाटील म्हणाले की, रस्त्यावरील खड्ड्यांसह पुलावरील नळ्या तुटल्या असल्याची पाहणी लवकरच करण्यात येईल. यानंतर संबंधित ठिकाणी दुरुस्ती करण्यात येईल.
रस्त्यावरील खड्ड्याने प्रवाशांची दैना
By admin | Updated: July 14, 2014 01:00 IST