जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. दिवसेंदिवस रक्ताची मोठी गरज भासते आहे. विशेषत: घातपात, अपघात, गंभीर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांना वेगवेगळ्या रक्तगटाच्या पिशव्यांची मोठी गरज निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक दवाखान्यातील खर्चांसह औषधोपचारामुळे आर्थिक विवंचनेत सापडत असताना आता रक्त व रक्त घटकांतील सेवाशुल्कातील अडीचपट वाढ या रुग्णांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड देणारी बाब ठरणार आहे. राष्ट्रीय रक्त धोरण व्यवस्थितरीत्या राबविण्याच्या दृष्टीने रक्त व रक्तघटकांवरील सेवाशुल्क सुधारित करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. रक्त व रक्तघटकांची प्रक्रिया, चााचणी शुल्क सुधाीरत व्हावेत यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने रेड क्रॉस, शासकीय रक्तपेढी, अन्न व औषध प्रशासन यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली १६ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार सुधारित सेवाशुक्लाचा प्रस्ताव राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेस पाठविण्यात आला होता. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दिवसाला चाळीस तर वर्षाला तब्बल बारा हजार रक्तपिशव्यांची गरज भासत आहे. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीसह जनकल्याण रक्तपेढीवरच रूग्णांसह कुटुंबियांची दारोमदार अवलंबून आहे. या दोन्ही रक्तपेढ्या ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करीत आल्या आहेत. आता सरकारच्या अडीच पट वाढीच्या निर्णयाचा तडाखा रुग्णांसह कुटुंबियांना बसणार, हे स्पष्ट आहे. रक्तपेढ्यांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असे चित्र आहे. मुळात रक्तपेढ्या चालविणेच मोठे आव्हान ठरले आहे. परंतु विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या भक्कम सहकार्याने या रक्तपेढ्या अविरत सेवा देत आल्या आहेत. (प्रतिनिधी)
रुग्णांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड
By admin | Updated: June 22, 2014 00:10 IST