विडा : केज तालुक्यातील विडा परिसरातील ६० हजार नागरिकांचा भार विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. इमारतही अपुरी पडत असून, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येथील आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. येथील आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी विडा परिसरातील ४३ ग्रामपंचायतींनी केली आहे.विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांची संख्या व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र रुग्णालयाच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही वाढ न झाल्याने येथील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नाही. या संदर्भात विडा परिसरातील ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी ग्रामसभा घेऊन विडा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या, अशी मागणी करणार असल्याचे येथील कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, शिवाजी वाघमारे, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पटाईत यांनी सांगितले. विडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाल्यापासून या आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधांमध्ये किरकोळ दुरुस्तीशिवाय कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. ३० वर्षात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे सध्या असलेली इमारत अपुरी पडत आहे. याशिवाय १७ कर्मचाऱ्यांचा ताफा कमी पडत आहे. परिणामी नागरिकांना राज्याच्या असुविधेला सामोरे जावे लागत आहे.विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन येथील आरोग्य सेवा वाढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. असे झाले तरच विडा परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या यंत्रणेला दोषी ठरवून चालणार नाही तर खाटांची संख्या वाढवून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वाढविणे आवश्यक असल्याचे देखील येथील नागरिकांनी सांगितले. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी पंचायत समिती सदस्य विजयकुमार पटाईत, जि.प. सदस्य उषा मुंडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (वार्ताहर)
रुग्णसेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल
By admin | Updated: August 25, 2014 23:43 IST