बीड : तालुक्यातील पिंपळवाडी येथे दोन गटातील मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचा पोलीस जवाब घेत नाही, असा आरोप करून नातेवाईकांनी शनिवारी झोळीत टाकून त्याला थेट अधीक्षक कार्यालयात नेले. या प्रकरणी नेकनूर ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.पिंपळवाडी येथील तानाजी काळे याचे गावात सलूनचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ९ ते १० जणांनी त्याला बेदम मारहाण केली. यात तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजता नेकनूर पोलीस जवाब घेत नाहीत, तक्रार न नोंदविण्यासाठी दबाव आणतात, असा आरोप करून नातेवाईकांनी त्याला जिल्हा रूग्णालयातून झोळीत टाकत लगतच असलेल्या अधीक्षक कार्यालयात आणले. अधीक्षक अनिल पारसकर यावेळी कार्यालयात नव्हते. कर्मचाऱ्यांनी वायरलेसवरून नेकनूर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर त्याचा जवाब नोंदविण्यात आला.दरम्यान, दुसऱ्या गटाचे दत्ता महादेव साळवे यांचीही पोलिसांनी फिर्याद घेतली असून, तानाजी काळेसह चौघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केला आहे. तानाजी काळे याच्या फिर्यादीवरून दत्ता साळवेसह इतरांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.याबाबत सहायक निरीक्षक प्रवीण चव्हाण म्हणाले, दोन गटात हाणामाऱ्या झाल्याने दोन्ही फिर्यादी नोंदविल्या आहेत. तानाजी काळे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. (प्रतिनिधी)
रूग्ण थेट झोळीतून अधीक्षक कार्यालयात
By admin | Updated: July 31, 2016 01:14 IST