पाटोदा : पारधी समाजातील अल्पवयीन मुलीचा विवाह पाटोदा पोलिसांनी नातेवाईकांचे समुपदेशन करून मंगळवारी रोखला. तालुक्यातील भूरेवाडी येथे हा विवाह होणार होता.तालुक्यातील भूरेवाडी येथे स्थायिक झालेले पारधी समाजातील एक कुटूंब आहे. श्रीराम काळे हा येथे सहकुटूंब राहतो. मुलगा कैलास याचा विवाह नात्यातील भूम येथील एका मुलीशी निश्चीत झाला होता. मुलगी ही तिच्या आजीकडेच भूमला रहात आहे. मुलीच्या वडिलांना विवाहाची माहिती समाजल्यानंतर त्यांनी मुलगी १५ वर्षाची अल्पवयीन असल्याचे स्थानिक प्रशासनाला कळविले.पाटोदा पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक एस.बी.हुंंबे, यांनी सहायक पोलिस निरीक्षक एस.एम.राठोड, जमादार आसेफ शेख, आर.एस. नन्नवरे, महिला पोलीस मनिषा ओव्हाळ, डोके, जमादार शेळके, जे.डी. आडे, आर.डी.बारगजे हे सर्व अधिकारी, कर्मचारी भोरेवाडी येथे दाखल झाले.मुलाचे वडील श्रीराम काळे, आई अपृगा हे मुलीसह नातेवाईकांची वाट पहात बसले होते. पोलिसांनी काळे कुटुंबियांचे समुपदेशन केले. दोन्ही कुटुंबियांच्या लोकांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अल्पवयात विवाह करणे गुन्हा असून हे त्या विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांनाही धोकादायक असल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल ेसमुपदेशन नातेवाईकांना पटले आणि त्यांनी तो विवाह रोखला.एरव्ही पोलीस गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोहचतात. येथे पोलिसांनी आपली सतर्कता दाखवून नातेवाईकांच्या समुपदेशनाने अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. एक गुन्हा घडण्यापासून पोलिसांनी हातभार लावल्याने त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.या प्रकरणातील मुलगी ही भूम येथील रहिवाशी असून मुलगा पाटोदा तालुक्यातील भूरेवाडी येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी हा विवाह रोखल्यामुळे त्यांचे स्वागत केले जात आहे. यापुढे असे काही प्रकार निदर्शनास आल्यावर संबंधीत पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे अवाहनही पाटोदा पोलिसांनी केले आहे. (वार्ताहर)
पाटोद्यात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
By admin | Updated: September 18, 2014 00:40 IST