औरंगाबाद : रुग्णालयात जाण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या दोन प्रवाशांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करून लुटणाऱ्या रिक्षाचालक व त्याच्या सोबत्याला पोलिसांनी पकडले.रिक्षाचालक राजू शेळके (२९, रा. पेठेनगर, भावसिंगपुरा) आणि त्याचा साथीदार लक्ष्मण शेषराव गायकवाड (४०, रा. भावसिंगपुरा) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आष्टी (ता. परतूर) येथील रहिवासी बाळू बाबूराव तळेकर आणि त्यांचे नातेवाईक शंकर आगलावे हे २७ जून रोजी रेल्वेने येथे आले होते. रेल्वेस्टेशनवरून त्यांनी आमखास मैदान येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षा (क्रमांक एमएच-२० डब्ल्यू-३८०१) ठरविली. रिक्षाचालकाने त्यांना रुग्णालयात न नेता रेल्वेस्टेशन एमआयडीसीत नेले. तेथे त्याने लक्ष्मण गायकवाडला सोबत घेतले. या दोघांनी तळेकर आणि आगलावे यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख १२०० रुपये आणि कागदपत्रांची बॅग हिसकावून पळून गेले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. ते डोंगराच्या पायथ्याशी दारू पीत असल्याचे समजले. तेथे त्यांना पकडून रात्रीच ३ वाजता क्रांतीचौक पोलिसांच्या ताब्यात दिले, असे ठाकरे यांनी सांगितले. लुटलेल्या पैशातून दारूप्रवाशांना लुटल्यावर ते दोघे दुकानातून दारूच्या बाटल्या घेऊन भावसिंगपुरा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी प्यायला गेले होते.
प्रवाशांना लुटले, दोघांना अटक
By admin | Updated: June 30, 2014 01:05 IST