उस्मानाबाद : ‘छोटा बच्चा समझके हमको़़’ या गितांचे बोल लहान मुलांना आकर्षित करून गेले आहेत़ मात्र, लहान मुलगा म्हणून त्याकडे दूर्लक्ष होत असल्याने मुलांची पावलं गुन्हेगारीकडे वळत असल्याचं भीषण चित्र समोर येत आहे़ चोरी, विनयभंगासह हाणामाऱ्यांमध्ये लहान मुलांचा सहभाग वाढल्याचे दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे़‘मुलं म्हणजे देवाघरची फुलं’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे़ मात्र, हीच फुले गुन्हेगारीसारख्या काटेरी विश्वाकडे वळत आहेत़ शाळेतील किरकोळ कारणावरून होणाऱ्या हाणामाऱ्या, प्रेमप्रकरणातून उद्भवणारी भांडणे ही नित्याचीच बाब बनली आहे़ तर पोलिस दप्तरी चोरी, घरफोडी, हाणामारीसह इतर गुन्ह्याखाली बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ एरव्ही मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये बालगुन्हेगारी वाढल्याची माहिती मिळत होती़ मात्र, जिल्ह्यातील बालगुन्हेगारांच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे़ सन २०१३ मध्ये १५६, सन २०१४ मध्ये १५६ तर चालू वर्षी मे महिन्यापर्यंत ४३ बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ही आकडेवारी चिंताजनक अशीच आहे़ शाळा महाविद्यालयासह शिकवणीमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्यांचे प्रकार मध्यस्थीने मिटविले जात असले तरी त्यातून निर्माण होणारी खुन्नस पुढे मोठ्या हाणामारीत रूपांतरीत होते़ अशा काही घटना पोलिसांनी हस्तक्षेप करूनही मिटविल्या आहेत़ मात्र, बालगुन्हेगारांचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण हे पालकांसमोर गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे़ वाढत्या बालगुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांसह पालकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे़ (प्रतिनिधी)
चोरी, विनयभंगासह हाणामाऱ्यातही सहभाग
By admin | Updated: August 12, 2014 01:58 IST