परभणी : मराठवाड्यातील व्यापार विषयक अडचणी, विकास, कायदेविषयक समस्या, व्यापार व कररचना या संदर्भात विचार मंथन करण्यासाठी परभणी येथे मराठवाडा विभागीय व्यापार परिषदेचे १७ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत माहिती देताना अध्यक्ष अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दुष्काळ निवारणार्थ ५० रुपये तात्पुरता व्यवसायिक कर लावला होता. आज हा कर २ हजार ५०० रुपयापर्यंत वाढवून तो कायम करण्यात आला आहे, हे अन्यायकारक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्ता मिळावी, यासाठी सुरु केलेला चुंगीकर केवळ महाराष्ट्रातच आहे. यामुळे व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मूल्यवर्धीतकर स्वीकारण्यासाठी व्यावसायिक कर, उपकर, चुंगीकर, विक्रीकर बंद करु, असे आश्वासन शासनाने दिले होते. याशिवाय वाढलेले भारनियमन, एलबीटीबाबतच्या जाचक अटी आदी संदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच सुटसुटीत कररचना व एक खिडकी पद्धती असावी, ‘व्यापारी पेंशन प्लान’ योजना सुरु करावी, आदी मागण्या संदर्भातही परभणीत १७ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता अक्षदा मंगल कार्यालयात होणाऱ्या मराठवाडा विभागीय व्यापार परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अॅण्ड कॉमर्सच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध उद्योजकांची व मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रपरिषदेस मराठवाडा चेंबर आॅफ कॉर्मसचे कार्याध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सूर्यकांत हाके आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांच्या अडचणीवर होणार परभणीत मंथन
By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST