ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद : जेसीबीच्या धक्क्याने कोसळलेल्या भिंतीखाली दबून पेंटर जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (दि.१७) सकाळी ११.३० वाजता पोलीस आयुक्तालय कार्यालयात घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात जेसीबीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अशोक ऊर्फ बबन कमलनाथ श्रीरंग (५५, रा. कोतवालपुरा) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पेंटरचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत अशोक हा पोलीस आयुक्तकार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाची लहान, मोठी कामे मजुरीने करीत असे. अशोक सोमवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या जुन्या इमारतीमागील संरक्षक भिंतीला खाली बसून रंग देत होता. पोलीस आयुक्तालयाची इमारत पाडण्याचे काम तीन ते चार जेसीबीद्वारे केले जात आहे.
यापैकी एक जेसीबी (क्रमांक एमएच-१२ जेके ०२५) इंधन भरण्यासाठी बाहेर पडत असताना भिंतीला धडकला. या धडकेत भिंतीचा अर्धा भाग रंग देत असलेल्या पेंटरच्या अंगावर पडला. त्यामुळे पेंटर गंभीर जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध पडला. आवारात काम करीत असलेल्या मजुरांनी आरडाओरड केली. त्यानंतर जखमी पेंटरला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी जेसीबी सोडून चालक पळून गेला. डॉक्टरांनी तपासून अशोक यास मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख सलीम, उपनिरीक्षक बांगर, पोहेकॉ. देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात जेसीबीचालक जुबेर खान गुलखान (२५, रा. रहिमनगर, किराडपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फरार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेख सलीम यांनी दिली.
मृत अशोक हा रोजंदारी मजूरअशोक हा पोलीस आयुक्त कार्यालय आणि परिसरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवीत असे. विशेषत: पोलीस आयुक्त कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा कार्यालयाकडून त्यास विविध प्रकारची कामे करण्यासाठी बोलविण्यात येई. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या जुन्या इमारतीला रंग देण्याचे काम दोन दिवसांपासून पेंटर अशोक करीत होता.जखमी अशोकला उचलून नेल्यानंतर त्याचा ब्रश व रंग तेथे पडलेला होता. शिवाय रंगही सांडला होता.