बीड : सलग चार वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यात गतवर्षी सरासरी एवढा पाऊस झाला. मात्र, २०१५ मध्ये रबी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाला. तो पुन्हा आलाच नाही. रबी पिकांच्या विम्यपोटी जिल्ह्याला २७६ कोटी ५१ लाख रूपये गुरूवारी मंजूर झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.रबी हंगामामध्ये पंतप्रधान विमा योजनेंतर्गत साडेचार लाख शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली होती. विमा भरून घेण्यात राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँक अग्रेसर होती. नियमित कामकाजाच्या वेळापेक्षा अतिरिक्त वेळ देऊन अधिकारी - कर्मचाऱ्यांनी विमा रक्कम भरून घेतली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर रबी हंगामासाठी विमा मंजूर झाला आहे.लाभार्थ्यांच्या याद्या तयार होणारपीकविम्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच तयार होणार आहेत. पीकनिहाय नुकसानीचे वाटप होणार असून, त्यासाठी पीक महसूल मंडळ, तालुका व शाखानिहाय याद्या बनवाव्या लागणार आहेत. त्यासाठी महिनाभराचा अवधी लागणार आहे.संचालकांची बैठकरबी हंगामातील पीकविमा नुकसान भरपाई मंजूर झाल्यानंतर जिल्हा बँकेत संचालकांची बैठक पार पडली. यावेळी पीकविम्याच्या वाटपाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, तज्ञ संचालक वसंतराव सानप, महादेव तोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास देशमुख, उप व्यवस्थापक संजय राठोड, केशवराव आघाव, दत्तात्रय आघाव, एस. सी. ठोंबरे, ए. पी. सुर्वे उपस्थित होते. एकही शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी गडबड गोंधळ न करता पीकविम्याची रक्कम बँकेमार्फत स्वीकारावी, असे आवाहन आदित्य सारडा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
२७६ कोटींचा पीकविमा
By admin | Updated: March 3, 2017 01:20 IST