रामेश्वर काकडे, नांदेडेसहकारी संस्थांच्या निवडणुकीत मतदान करावयाचे झाल्यास संबंधित सभासद थकबाकीदार असेल तर सहकार कायद्याच्या नवीन बदलानुसार मतदानाचा अधिकार नाकारला आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश थकबाकीदार सभासद मतदानाला मूकणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या तसेच विविध सहकारी संस्था यांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर महिन्यात होण्याचे संकेत आहेत. याकामी सहकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुका सुरु असून या निवडणुका पार पडल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँकेची तर त्यानंतर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. यासाठी सभासद यादी (आय) नमून्यात तयार करण्याचे काम संस्थाकडून सुरु असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक व्ही. डी. कहाळेकर यांनी दिली.नांदेड जिल्हा बँक डबघाईस येवून बंद पडल्यानंतर २००५ पासून जिल्हा बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र आता तब्बल दहा वर्षानंतर या बँकेची निवडणूक होणार असल्याने सर्वच सभासद कामाला लागले असून या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांची भूमिकाही महत्वाची राहणार आहे. मध्यवर्ती बँकेच्या चाव्या आपल्या हातात कशा येतील यासाठी पक्षांचा हस्तक्षेप वाढल्याने रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.जिल्हा बँकेचे मतदार बँकेचे सभासद, सेवा सहाकारी सोसायटयांचे तसेच इतर सर्व सहकारी संस्थाचे सभासद हे मतदार आहेत. मात्र ज्या सभासदाने जिल्हा बँकेतील शेअर्सची रक्कम पूर्ण भरली त्याच मतदाराला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.जिल्ह्यात एकूण ९८१ विविध कार्यकारी सहकारी संस्था असून यापैकी ९५९ संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. यातील ६३७ संस्थांच्या निवडणूका पार पडलेल्या आहेत. त्यातील २४९ सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर कार्यकाळ संपलेल्या उर्वरित ३५५ सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर महिन्यात लागण्याचे संकेत आहेत.नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असलेल्या तालुकानिहाय सहकारी संस्थांची संख्या अशी - हदगांव २३, भोकर २२, किनवट ५४, माहुर २२, लोहा ५२, कंधार २२, देगलूर ३०, मुखेड ५, अर्धापूर ८, नांदेड ८, मुदखेड २४, नायगांव ३४, धर्माबाद ३ तर बिलोली तालुक्यातील १५ या व इतर अशा ३५५ सहकारी संस्थांंचा समावेश आहे.
थकबाकीदार सभासद मतदानाला मुकणार
By admin | Updated: September 26, 2014 00:43 IST