शिवराज बिचेवार । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याचा गवगवा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे़ या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होवून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे़ परंतु दुसरीकडे हाच शेतकरी मात्र वर्षानुवर्षे सावकारीच्या जाळ्यात अडकला आहे़ दरवर्षी सावकारीची प्रकरणे वाढतच जात असून सध्या उपनिबंधक कार्यालयाकडे अशा १५ प्रकरणांची सुनावणी सुरु आहे़ सावकारी वर्षानुवर्षे चालत आली आहे़ काळाच्या ओघात बारा बलुतेदारी पद्धत नामशेष झाली आहे़ मात्र सावकारीची भरभराटच होत आहे़ धनदांडग्यांच्या उपजीविकेचे आणि अधिकचे उत्पन्न कमाविण्याचे सावकारी हे प्रमुख साधन बनले आहे़ त्यामुळे अडल्या-नडल्यांना वेळेवर मदत मिळत असली तरी, सावकारांकडून होणाऱ्या छळाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे़ त्यानंतर शासनाने अधिकृत सावकारी अन् अनधिकृत सावकारी अशी विभागणी केली़ बँकेत कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसाठी खेटे मारण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांनी गावातीलच सावकारांचे उंबरठे ओलांडल्याचे चित्र आजही पहावयास मिळते़ त्यामुळे बँकांतील कर्जाची माफी झाली असली तरी, प्रत्यक्षात सावकारांच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवर कायम राहणार आहे़ उपनिबंधक कार्यालयाकडून सावकारांना अधिकृत परवानेही दिले़ आहेत. आजघडीला जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या २४२ एवढी आहे़ दरवर्षी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाते़ त्यांच्याबाबत तक्रारी आल्या अन् त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जात नाही़ शेती आणि बिगरशेती कर्जासाठी व्याजाचे दर निश्चित केले असताना अनेक सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी केली जाते़ अशा जिल्ह्यात मार्चपर्यंत उपनिबंधक कार्यालयाकडे एकूण १५ तक्रारी आल्या आहेत़ त्यांची सध्या सुनावणी सुरु आहे़ या सुनावणीत ते दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध सावकारी अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात येणार आहे़ गतवर्षी अशा एकूण ५६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, परंतु त्यामध्ये आतापर्यंत एकालाही शिक्षा झाली नाही, हे विशेष! तर ग्रामीण भागातील अनेक प्रकरणे समोरच येत नाहीत, हेही तितकेच वास्तव आहे़ त्यामुळे सावकारीचा पाश दिवसेंदिवस आणखी घट्ट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कर्जातून सुटला, सावकारीत अडकला
By admin | Updated: June 24, 2017 23:49 IST