औसा/उदगीर : औसा नगरपालिकेच्या प्रभाग क्र. २ मधील सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेख मेहरुनिसा महेराज या २१२९ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार शेख अन्वरबी यांना केवळ ४०० मते पडली. तर अपक्ष उमेदवार शेख शमा कुतबोद्दीन यांना १५१, शेख सईदाबेगम फाहिम यांना ११९ मते पडली. तर २९ मतदारांनी नोटाचा वापर केला. उदगीर नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखली.राष्ट्रवादीच्या नगरसेविका शेख शकिलाबी यांच्या निधनामुळे या प्रभागात पोटनिवडणूक झाली. निवडणुकीच्या मैदानात चार महिला उमेदवार लढतीत होत्या. मात्र खरी लढत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांतच झाली. दोन्हीही अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीची जागा कायम राखण्यासाठी मोठे आव्हान होते. मात्र उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते डॉ. अफसर शेख यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून विजय प्राप्त केला. शिवसेनेच्या उमेदवारासाठी युतीच्या स्थानिक नेतेमंडळींनीदेखील प्रचारात जोर लावला होता. मात्र राष्ट्रवादीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. गुरुवारी सकाळी औसा तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या उमेदवाराची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. फटाके फोडून सर्व कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. (वार्ताहर)
औशात राष्ट्रवादी; उदगीरमध्ये काँग्रेस
By admin | Updated: April 24, 2015 00:38 IST