लातूर : येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे व किटक नाशके योग्य दर्जाची मिळावीत म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हंगामापूर्वीच दक्षता घेतली आहे़ जिल्हा व तालुका स्तरावर कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन केला असून, भरारी पथकेही कार्यान्वयीत केली आहेत़ खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ आॅगस्ट व रबी हंगामासाठी १५ सप्टेबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत पथके व नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहेत़ त्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना आपला मुळ पदभार सांभाळून कक्षात व पथकात काम करण्याचे निर्देष दिले आहेत़लातूर जिल्ह्यातील बी-बियाणे, खत व किटक नाशके विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना योग्य दर्जाची व योग्य वेळी व योग्य किंमतीत मिळावीत म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्याने तक्रार निवारण कक्ष व भरारी पथके स्थापन केली आहेत़ शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचीही जबाबदारी स्विकारली आहे़ तक्रार निवारण कक्ष जिल्हा स्तरावर व तालुकास्तरावर असेल़ खत, बी-बियाणे व किटक नाशकाच्या तक्रारी प्राप्त होताच त्याची नोंदवहीमध्ये नोंद करुन घेतली जाईल़ तक्रारीचे स्वरुप, तक्रार प्राप्त दिनांक, वेळ व त्याला केलेले मार्गदर्शन या बाबी नोंदवहीत नमुद असतील़ तक्रार निवारण कक्ष सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील़ तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे सर्व कृषी विकास अधिकारी, आयुक्तालयातील अधिकारी, जिल्हा व तालुक्यातील सर्व विक्रेत्यांचा दुरध्वनी क्रमांक असेल़ कक्षप्रमुख म्हणून जिल्हा कृषी अधिकारी असतील, त्यांना आपला मुळ कार्यभार सांभाळून तक्रार निवारण कक्षात दुपारी २़३० ते सायंकाळी ७ पर्यंत उपस्थित राहणे बंधनकारक असेल, कार्यालयीन अधिक्षकांसही सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तक्रार निवारण कक्षात असणे बंधनकारक आहे़ तालुक्याच्या ठिकाणी कृषी अधिकारी कक्षप्रमुख असतील, त्यांनाही जिल्हा स्तरावरचा नियम लागू असेल़ तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तक्रारीची वेळीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षीत आहे़ कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात सादर करणे बंधनकारक आहे़ (प्रतिनिधी)
कृषी निविष्ठांच्या नियंत्रणासाठी कृषीची भरारी पथके तैनात
By admin | Updated: May 11, 2015 00:32 IST