मुखेड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे लेखा परीक्षण (आॅडिट) करून अभिलेखे सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ ग्रामपंचायतींच्या सहा ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकारी व्ही़ बी़ कांबळे यांनी काढले आहेत़मुखेड तालुक्यात मनरेगाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली़ ही कामे करीत असताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला़ या प्रकरणी १८ ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून ५२ ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची विभागीय व जिल्हा समितीमार्फत चौकशी करण्यात आली होती व देयकेही जप्त करण्यात आले होते़तालुक्यातील १२७ ग्रामपंचायतीचे २०१३-१४ लेखा परीक्षण करून अभिलेखे पंचायत समितीच्या विभागप्रमुखाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते़ पण आडलूर, नंदगाव, हंगरगा (पक़़ं), हसनाळ (प़दे़), इटग्याळ (प़मु़), पाळा, पिपळकुंटा, सुगाव (खु़)़, तुपदाळ (खु़) ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण करून अभिलेखे सादर करण्यास संबंधित ग्रामसेवकांनी टाळाटाळ करीत असल्याने वरिष्ठांच्या सूचनेवरून गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामसेवक ए़एस़ आचनगार (अडलूर-नंदगाव ग्रा़पं़), यु़जी़येन्डे (हंगरगा पक़ं़) हसनाळ (प़दे़), आऱटी़ तोटावार (इटग्याळ प़मु़), सी़पी़ कोल्हे (पाळा, तुपदाळ खु़), सय्यद नजीर (पिपळकुंठा), एस़एम़सोनकांबळे (सुगाव खु़) यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मनरेगा विभागाचे विभागप्रमुख एक़े़ धनवाडे यांना देण्यात आले आहेत़ याप्रकरणी कांबळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, संबंधित ग्रामसेवकांना वेळोवेळी सूचना देवूनही लेखा परीक्षण करून अभिलेखे सादर करण्यास टाळाटाळ व कुचराई केली आहे व सन २०१३-१४ चे लेखा परीक्षण करून अभिलेखे सादर करण्याच्या कामात मदत करण्यास टाळाटाळ केल्याने (मनरेगाचे) उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्या सूचनेवरून वरील ग्रामसेवकांवर ६ आॅगस्ट रोजी मुखेड पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले़ (वार्ताहर)
सहा ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश
By admin | Updated: August 6, 2014 02:17 IST