हिंगोली: जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ‘लोकमत’च्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी बुधवारी तलाठ्यांच्या उपस्थिती बाबतचे स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महसूल विभागामध्ये गुरूवारी खळबळ उडाली. कामचुकार तलाठ्याचे पितळ उघडे पडल्याने जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सकाळीच वॉटस् अॅपवर पाचही तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना बातमीचे कात्रण पाठवून या बाबत चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.सध्या शैक्षणिक कादगपत्रांसाठी विद्यार्थी तसेच शेती विषयक कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांची आवश्यकता असताना अनेक तलाठी महिनोमहिने सज्जावर जातच नसल्याचे बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उघड झाले होते. याबाबतचे वृत्त गुरूवारी प्रसिद्ध होताच अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे फोन करून स्वागत केले. तसेच तलाठ्यांचे पितळ उघडे पाडल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले. या वृत्ताने महसूल विभाग खडबडून जागा झाला. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सकाळीच पाचही तहसीलदार तसेच हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, वसमतच्या उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी यांना या प्रकरणी तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याबाबत तसे लेखी पत्र देण्यास निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी यांना सांगितले. या बाबत ‘लोकमत’शी बोलताना जिल्हाधिकारी पोयाम म्हणाले की, यापुढे प्रत्येक तलाठ्याने त्यांच्या सज्जावर उपस्थित राहण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. त्यामध्येही तलाठी दोषी आढळून आले तर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाई केली जाईल. जनतेची गैरसोय बिलकुल खपवून घेतली जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. या संदर्भात हिंगोली उपविभागीय अधिकारी तडवी यांनी हिंगोली व सेनगावचे तहसीलदार यांना त्यांचे तलाठ्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)पाच तलाठ्यांना बजावल्या नोटिसा सज्जावर बुधवारी गैरहजर असलेल्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील तलाठी यू.आर. डाखोरे, शिवणी बु. येथील तलाठी गंगाधर पाखरे, धानोरा (ज.) येथील भारत पडोळे, वाई येथील तलाठी जी.जी. देवकर, बाभळी येथील तलाठी चंद्रकांत धुमाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती कळमनुरीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कृष्णकांत चिकुर्ते यांनी सांगितली.सामुहिक तलाठी सज्जास कुलूपवसमत येथे १० ते १२ तलाठ्यांनी एकत्र येवून निर्माण केलेल्या सामुहिक तलाठी सज्जास गुरूवारी कुलूप असल्याचे दिसून आले. या कार्यालया बाहेर आसेगाव, सुनेगाव येथील ग्रामस्थ तलाठ्यांची वाट पाहत असताना दिसून आले. बेजबाबदार व शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही यावेळी या शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे आदेश
By admin | Updated: June 27, 2014 00:16 IST