हिंगोली: केवळ कागदी मेळ घालत न बसता आगामी काळातील संभाव्य टंचाईची गंभीर स्थिती लक्षात घेता ज्या गावात पाणीपुरवठा योजना आहेत. त्या का बंद आहेत? याची कारणे शोधून तात्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी.जी.कासार यांनी दिले.दुष्काळी स्थितीवर मात करणे एवढेच लक्ष्य ठेवता कामा नये. भविष्यात या परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी जलसंधारण, मृदसंधारण, रोहयोअंतर्गतची कामे व कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेऊन प्रभावीपणे राबविण्यात आली पाहिजे, असेही कासार म्हणाले. टप्पानिहाय टंचाई आराखडे वेळेत सादर करा. तसेच बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कनिष्ठ अभियंत्यांमार्फत तपासणी करून त्या तात्काळ दुरूस्त झाल्या पाहिजे. जिल्हा परिषदेला वित्त आयोगाचा मिळालेला निधी प्राधान्याने पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच वीजबिल थकल्यामुळे बंद पडलेल्या योजनांसाठी शासनाच्या सवलतीचा लाभ घ्यावा. गावकऱ्यांनाही त्याबाबत मार्गदर्शन करून या योजनेचे प्रस्ताव सादर करून थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यास त्यांनी सांगितले. पहिला पर्याय म्हणून बोअर घ्यायचा आहे. मात्र तो घेताना ठरविलेले स्थळ कायम राहिले पाहिजे. अंतिम पर्याय म्हणूनच टँकर वापरावे. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तपासणी करूनच हे प्रस्ताव द्यावेत. साडेचार लाख पशुधनासाठी सात लाख दोन हजार मे.टन चाऱ्याची आवश्यकता आहे. नवीन चारा उपलब्धतेसाठी मका, न्यूट्रीफिड बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होण्यासाठी मग्रारोहयोत कामे प्रस्तावित करून मागेल त्याला काम मिळण्याचे नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)