तळणी : तळणीसह परिसरातील १६ गावात महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेएस. ३३५ लॉट नं. ६६३ या वाणात भेसळ निघाल्याने ३० ते ४० टक्के नुकसान होणार असल्याचे वृत्त ्न‘लोकमत’ने प्रकाशित करताच तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून शनिवारी प्रत्यक्ष शेतावर येऊन त्या सोयाबीनच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश परतूरच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तळणीसह दहीफळ खंदारे, तळेगाव , वडगाव, दूधा, वझर सरकटे, आनंदवाडी, सासखेडा, कोकंरबा, शिरपूर, देवढाणा, कानडी, वाघाळा, दहातांडा, जाभरूम व वझर कुटे या गावातील ७० शेतकऱ्यांनी १३० बॅग महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेएस ३३५ लॉट नं. ६६३ या वाण खरेदी करून शेकडो एकरावर पेरणी केली आहे. सद्यस्थितीत सोयाबीन पीक जोमात आहे. मात्र, महामंडळाचे महाबीज सोयाबीनच्या वाणात भेसळ आढळून आल्याने ६० टक्के झाडांच्या शेंगा पक्वतेचा अवस्थेत असुन ३० ते ४० टक्के झाडांना नुकतेच फुलेधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार होते. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून २९ आॅगस्ट रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणला होता. परतुरचे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी याची गंभीर दखल घेत या सोयाबीन पिकाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
‘त्या’ सोयाबीन पिकाची पाहणी करण्याचे आदेश
By admin | Updated: September 1, 2016 01:00 IST