लोहारा : लोकमंगल मल्टीस्टेट शाखेतील ५ लाख २१ हजार ३८० रूपये चोरी प्रकरणात बँकेकडून पोलिसांना देण्यात आलेले ‘सीसीटीव्ही फुटेज’ ओपन होत नसल्याने चोरीच्या उलगड्याचे आव्हान पोलिसांसमोर उभा राहिले आहे़ मिळालेले सीसीटीव्ही फुटेज ओपन करण्यासाठी पोलिसांनी तज्ञांना बोलाविले असून, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच इतर बाबी समोर येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे़लोहारा शहरातील लोकमंगल मल्टीस्टेट शाखेवर २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दरोडा पडला होता. या वेळी चोरांनी तिजोरीतील ५ लाख रुपये व काऊंटर मधील २१ हजार, ३८० रूपये लंपास केले होते़ घटनेची माहीती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोनि संतोष गायकवाड, सपोनि शाहुराज भिमाळे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ यावेळी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याच्या पिना काढल्याचे दिसून आले़ पोलिसांनी पिना लावून सीसीटीव्ही सुरू केला़ शिवाय बाहेरील बाजुचे विजेचे किटकॅटही चोरट्यांनी काढले होते़ पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याची पाहणी केली असता घटनेच्या मध्यरात्री २ वाजून ५५ मिनिटापर्यंत सीसीटीव्ही सुरू असल्याचे समोर आले होते़ त्यानंतर मात्र, सीसीटीव्ही बंद पडला होता़ आतमध्ये जाणारा सीसीटीव्हीत कैद होणे आवश्यक असताना तो फुटेजमध्ये दिसला नाही़ त्यामुळे किटकॅट आणि आतील पिना कोणी काढल्या ? याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आता संगणकाची तपासणी करण्यासाठी व फुटेज पाहण्यासाठी तज्ञांना पाचरण केले आहे़ शिवाय चोरीच्या आदल्या दिवशीच मल्टीस्टेटमध्ये कोणी लपले होते का ? या रहस्यमय प्रश्नाचे उत्तरही पोलिसांकडून तपासण्यात येत आहे़ पोलिसांच्या तपासणीअंतीच ही चोरी चोरट्यांनी केली की यामागे इतर कोणाचा हात आहे ? हे समोर येणार आहे़ (वार्ताहर)
‘फुटेज’ही होईनात ओपन !
By admin | Updated: November 30, 2015 23:30 IST