व्यंकटेश वैष्णव , बीडस्वस्त धान्य दुकानांवर साखरेचे वाटप होत नसल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे. दिवाळी ते दिवाळीच स्वस्त धान्य दुकानांवर साखर येत असल्याचे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सांगितले. यावर प्रशासनाने आता पर्यंत कसलीच कारवाई केलेली नसल्याचे पहावयास मिळते.शासनाने गोरगरीबांना स्वस्तात धान्य मिळावे यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये अन्नपूर्णा योजने अंतर्गत निराधारांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत जिल्ह्यात २ हजार ६०० लाभार्थी असून यांना अद्यापही पुरवठा विभागाकडून धान्य मिळालेले नाही. आॅगस्ट २०१४ चे साखरेचे नियतन मंजूर असून २० आॅगस्टपर्यंत साखरेचे वितरण करण्याच्या सूचना पत्रकात दिलेल्या आहेत. असे असताना देखील नागरिकांना साखर मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी साखर मिळालेली नसल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.बहुतांश गावच्या ग्रामस्थांनी सांगितले की, २०१३ च्या दिवाळीलाच आमच्या गावात स्वस्त धान्य दुकानावर साखर आली होती. त्यानंतर आम्हाला साखर मिळालीच नाही. ग्रामस्थांनी असे उत्तर दिले असल्याने पुरवठा विभागाच्या धान्य वितरण करणाऱ्या यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.अगोदरच महागाई व दुष्काळ याने जनता होरपळली आहे. यातच जनतेसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा देखील काळाबाजार होत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी पुरवठा अधिकारी एस़ व्ही़ सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, आलेली साखर नेमकी जाते कोठे ? याचे कोडे उलगडलेले नाही़ धान्याबरोबरच साखरेची विल्हेवाट लावणारी टोळीच कार्यरत झाली आहे़ अधिकारीच दलाल बनल्यामुळे गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याचा आरोप अरिहंत नेहरु युवाचे ललित अब्बड यांनी केला आहे़
फक्त दिवाळीलाच मिळते साखर
By admin | Updated: August 21, 2014 01:23 IST