लोहारा : शेकडो वर्षांपासून तालुक्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजे महादेवाची काठी महादेव मंदिरात उभारली जाते. शंभू महादेवाची अर्धांगिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काठीची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते. ही परंपरा आजही कायम सुरु आहे.तेरणा नदीच्या काठावर वसलेले लोहारा तालुक्यातील भातागळी हे गाव. गावात दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गावात प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभी न करता गावची शंभो महादेवाची काठी उभारली जाते. या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर चौथ्या दिवशी या ही काठी घेवून पायी शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर २५० किमीचे असून, दररोज ४० किमीचा पायी प्रवास करत भक्त हे अंतर सहा दिवसात पूर्ण करतात. ही काठी भातागळी, लोहारा, उस्मनाबाद, सोलापूर, पुणे सातारा जिल्ह्यातून शिंगणापूर जाते. शिखरशिंगणापूर येथे या काठीला विशेष मान आहे. तेथील कार्यक्रम पार पाडून ही काठी गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला परत भातागळीत येते. यंदा ही पौर्णिमा १२ एप्रिला आहे. या दिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परिसरातील भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यात महिला भक्तांची संख्या लक्षणीय असते. या दिवशीपासून येथे तीन दिवस मोठी यात्रा भरते.(वार्ताहर)
भातागळीत उभारली एकच गुढी
By admin | Updated: March 29, 2017 00:14 IST