लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी १७२.९५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून गुरूवारी चोवीस तासांत सरासरी ५़८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़ आजपर्यंत जिल्ह्यात केवळ १८.१० टक्के पाऊस झाल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली असून सर्वांचेच पावसासाठी आकाशाकडे लक्ष लागले आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत ६५ टक्क्याहून अधिक पेरण्या झाल्या आहेत़ सोयाबीन आणि कापसाचे प्रमाण वाढले असून मागील काही दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने पीक धोक्यात सापडले आहे़ सोयाबीन दोन ते तीन पानावर असून पावसाअभावी पिके माना टाकून देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ पंढरपूरची यात्रा परतल्यानंतर पाऊस पडतो, अशी बळीराजाला अपेक्षा आहे़ परंतु, यात्रा देखील गावापर्यंत पोहोचत असून पाऊस होईल, असे चित्र दिसत नाही़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून दुबार पेरणीचे संकट कोसळणार अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे़ येत्या दोन - चार दिवसांत जोराचा पाऊस होणे गरजेचे आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत जेवढ्या प्रमाणावर पाऊस व्हायला तसा झाला नाही़ येणाऱ्या काळात परिस्थिती बदलली नाही तर बळीराजांना अनेक अडचणीचा सामना करावा लागेल़ जिल्ह्यात ६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय असा - (कंसात एकूण पाऊस) नांदेड- ११.७५ (२५८.५३), मुदखेड - ९.६७ (२२६.६६), अर्धापूर- ३.३३ (१६९.३३), भोकर- २.७५ (१८९.५०), उमरी- १९.३३ (१३४.६६), कंधार- २.३३ (१७७.००), लोहा- ५.३३ (१६२.३३), किनवट- ५.७१ (२२६.८६), माहूर- २.०० (१७७.३८), हदगाव- १.४३ (१९८.१८), हिमायतनगर- १.३३ (११४.८१), देगलूर- १.६७ (११६.९९), बिलोली- ५.०० (१६१.६०), धर्माबाद- १२.०० (१६५.३४), नायगाव- ४.८० (१३७.६६), मुखेड ४.८६ (१५०.२९).
जिल्ह्यात केवळ १८ टक्के पाऊस
By admin | Updated: July 7, 2017 00:20 IST