जालना : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्याचा हंगाम आल्याने एस.टी महामंडळाच्या गाड्यामंध्ये गर्दी वाढल्याने आॅनलाईन बुकींग करण्याकडे प्रवाशांचा कल दिसून येत आहे. उन्हाळी सुट्या, लग्नसराई तसेच पर्यटनासाठी शहरातील नागरिक विविध ठिकाणी जात आहेत. त्यामुळेच एसटी गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. त्या तुलनेत गाड्यांची संख्या तोकडी पडत आहे. असे असले तरी, गर्दीत ऐनवेळी तारंबळ उडू नये म्हणून काही जागरूक प्रवाशांनी एसटीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन बुकींकवर जास्त भर दिला असल्याचे पहावयास मिळत आहे. आतापर्यंत गाड्यांमधून सहज जागा मिळत असल्यामुळे अॅडव्हान्स बुकिंग करण्याचा ट्रेंड तेवढा प्रचलित नव्हता. मात्र, सध्या सुट्यांचा हंगाम असल्यामुळे लांबच्या पल्ल्यासाठी रिझर्व्हेशन करूनच प्रवास करणार्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांना आपली जागा सुरक्षित असल्याची तसेच प्रवास चांगला होईल, याची हमी मिळते. त्यामुळेच एसटीच्या वतीने दोन वर्षांपासून आॅनलाईन बुकिंगची सुविधा कार्यान्वित करण्यात आली. आतापर्यंत जालना आगारातून २५७ प्रवाशांनी आॅनलाईन बुकिंग केले असून, त्यापोटी ७० हजारांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक देशमुख यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात एसटीची बुकिंग चालू असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आॅनलाईन बुकिंगपोटी आगाराला चांगले उत्पन्न मिळाले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. जालना, अंबड, परतूर, जाफराबाद, येथील प्रवाशांना देखील या आॅनलाईन प्रणालीचा फायदा होत आहे. आतापर्यंत चांगला प्रतिसाद प्रवाशांनी दिला आहे. गर्दीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विशिष्ट मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांच्या फेर्या वाढविण्यात आल्य आहेत. लग्नसराईमुळे काही कर्मचार्यांच्या सुट्यामंध्ये कपात केली आहे तर काहींना डबल ड्यूटी देण्यात आली आहे. जालना आगारात ७० ते ७५ गाड्या उपलब्ध आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी जालना आगार कटीबद्ध असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. दरम्यान, एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जात असल्याने प्रवाशांनी खाजगी ट्रॅव्हल्स ऐवजी एसटीलाच पसंती दिली आहे. (प्रतिनिधी) तालुक्यातूनही प्रतिसाद नागपूर, सोलापूर, अकोला, अमरावती, मेहकर, बीड, बुलढाणा या ठिकाणी जाण्यार्या प्रवाशांसाठी गाड्यांच्या फेर्या वाढविण्यात आल्या आहे. सर्व गाड्यांसाठी आॅनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध असून, साध्या गाडीसाठी नियमीत दरापेक्षा पाच रूपये जास्त तर निमआराम, हिरकणीसाठी सात रूपये जादार शुल्क आकारण्यात येत आहे. गर्दीच्या हंगामात चार किंवा सात दिवस सवलत पासलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यटनाला जाणार्यांसाठी किफायती ठरत आहे.
‘आॅनलाईन’ ,आरक्षण जोरात!
By admin | Updated: May 10, 2014 23:48 IST