लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माझे तुझ्यावर प्रेम होते, तू दुस-यासोबत लग्न का केले, असे म्हणत एका तरुणाने २८ वर्षीय विवाहितेची पतीसमोरच वस्त-याने गळा चिरून हत्या केली. शहरातील मोतीबागेसमोर बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणात सचिन सुभाष सुपारकर याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की औरंगाबादमधील सातारा परिसरात राहणारे रवी नारायण खिल्लारे (४२) हे नातेवाईकाच्या विवाह समारंभासाठी पत्नी कल्पना (२८) यांच्यासोबत जालन्यातील इंदिरानगर भागात आले होते. बुधवारी रात्री उशिरा बाजारात कपडे खरेदी केल्यानंतर दोघेही कारमधून (एमएच २०-सीएच ६४५०) टीव्ही सेंटरकडे जात असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास सचिन सुभाष सुपारकर (२७) याने मोतीबागेसमोर रवी खिल्लारे यांची कार थांबवली. कल्पना माझी बहीण असून, दोन मिनिटे बोलायचे आहे, असे सांगून त्यांना कारमधून खाली उतरवले. काही अंतर चालत गेल्यानंतर सचिनने ‘तू त्याच्यासोबत लग्न का केले’, असे म्हणत कल्पना यांच्या गळ्यावर वस्त-याने खोलवर वार केले. त्यामुळे त्या जागीच कोसळल्या.रवी खिल्लारे यांना काही कळण्यापूर्वीच सचिन दुचाकीवरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक बालासाहेब पवार, उपनिरीक्षक संपत पवार, शेजूळ यांनी घटनास्थळी पोहोचून कल्पना यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात रवी खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खुनासह अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.सचिन सुपारकर याला पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.कल्पना यांचे जालन्यातील इंदिरानगर भागात माहेर असून, येथेच त्या राहत होत्या. दरम्यान, सचिन सुपारकर याच्याशी त्यांची ओळख झाली. जुलै महिन्यात कल्पना यांनी औरंगाबाद येथील रवी खिल्लारे यांच्याशी दुसरा विवाह केला.खून केल्यानंतर सचिन सुपारकर कुच्चरवटा परिसरातील घरी पोहोचला. त्याने रक्ताने माखलेले कपडे फेकून दिले. त्यानंतर जेवण करून झोपी गेला. पोलिसांनी कल्पना यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर त्यांना सचिन सुपारकरबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून उचलले. सुरुवातीला त्याने आपण काहीच केले नसल्याचा बनाव केला. मात्र, हाताच्या नखांना लागलेल्या रक्तामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. खून करण्यासाठी वापरलेले हत्यार व रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले.
एकतर्फी प्रेमातून पतीसमोर हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:47 IST