नळदुर्ग : येथील ‘आपलं घर’ येथून पळून गेलेल्या दोघा मुलांपैकी एकजण सापडला असून, दुसरा मुलगा हॉटेलात काम करण्यासाठी निघून गेल्याची माहिती बालगृहाचे अधीक्षक शिवाजी पोतदार यांनी दिली.१७ मे रोजी या बालगृहातील राम सुभाष कांबळे आणि अंकुश भाऊसाहेब गुंडगिरे हे बेपत्ता झाले होते. यानंतर बालगृह प्रशासनाने मुलांना पळवून नेल्याची तक्रार नळदुर्ग पोलिस ठाण्यात दाखल करून चाईल्ड लाईन पदाधिकाऱ्यांच्या मदतीने या बालकांचा शोध सुरू ठेवला होता. यादरम्यान अंकुश गुंडगिरे हा उस्मानाबाद येथे त्याच्या आजीकडे आढळून आला. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. पोरवाल यांनी या मुलाचा प्रवेश रद्द करण्याची सूचना पोतदार यांना केली. मात्र, पोतदार यांनी त्यास नकार देत अंकुश याला पुन्हा बालगृहात ठेवून घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राम कांबळे हा अनाथ असून, त्यानेच अंक़ुश याला सोबत घेऊन हॉटेलात काम करण्यासाठी सोलापूर येथे नेले होते. यावेळी त्याने अंकुशला चाळीस रुपये दिले होते. मात्र, तेथे अंकुश याने रामसोबत भांडण करून उस्मानाबादकडे जाणारी बस गाठली. तो उस्मानाबादेत आजीकडे आल्यानंतर त्याने दोन दिवस भीक मागितली. उस्मानाबाद येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये आपली ६५ वर्षांची आजी राहत असून, भीक मागून मिळालेले पैसे आपण आजीला देत होतो, असे अंकुश याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बालगृहातून पळालेला एकजण सापडला
By admin | Updated: May 22, 2016 00:01 IST