जालना : जिल्ह्यात यंदा खरिपाची शंभर टक्के पेरणी झाली आहे. गत आठवड्यात झालेल्या सर्वदूर अशा समाधानकारक पावसामुळे पेरणी पूर्ण होऊ शकली. यंदा नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.सुमारे तीन लाख हेक्टर असलेले कापसाचे क्षेत्र यंदा ७० हजार हेक्टरने घटले आहे. साधारणपणे २ लाख ३३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. या उलट २० ते ३० हजार हेक्टर असलेले तुरीचे क्षेत्र यंदा ७० हजार हेक्टरच्या वर पोहचले आहे. कापसा खालोखाल सोयाबीन असून, सुमारे १ लाख हेक्टरवर सोयाबीन शेतकऱ्यांनी लावले आहे. मूग २० हजार हेक्टर लागवड करण्यात आली आहे. दोन वर्षांत तुरीच्या डाळीचे भाव दोनशे रूपयांच्या पुढे गेल्याने शेतकरीही सजग झाले आहेत. कापूस लागवडीसाठी खर्च जास्त लागतो. त्या तुलनेत भाव कमी मिळतो. गतवर्षी तुरीचे भाव प्रति क्विंटलला दहा ते बारा हजार रूपयांवर गेल्याने तुरी लागवड फायद्याची ठरेल हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तुरीचे लागवड झाली आहे. वीस दिवसांपूर्वी ८० टक्क्यांवर असलेली पेरणी मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शंभर टक्के झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने पेरणी केलेले शेतकरी धास्तावले होते. १५ जुलै अखेर २७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे माना टाकलेल्या पिकांनाही जीवदान मिळाले. पेरणीही शंभर टक्के पूर्ण झाली. या पावसामुळे आज रोजी जिल्ह्यातील पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
सर्वदूर पावसाने खरिपाची शंभर टक्के पेरणी
By admin | Updated: July 18, 2016 00:56 IST