माजलगाव: येथील ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक ओ.डी. माने यांच्याविरुद्ध गुरुवारी भाजपा, शिवसेना व बहुजन विकास मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी दीडशे जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ माने जनतेला न्याय देण्याऐवजी तक्रारदारांना धमकावतात असा आरोप महायुतीच्या मोर्चेकर्यांनी केला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी माने यांना निलंबित करण्याची मागणी केली़ आ. सतीश चव्हाण यांना रासवे खून प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. माने यांना निलंबित न केल्यास अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा बाबूराव पोटभरे यांनी दिला. सतीश सोळंके, आर.टी. देशमुख, अशोक तिडके, गंगाभिषण थावरे, अरुण राऊत, बबन सिरसट, मनोज जगताप, अविनाश जावळे आदी सहभागी होते़ माजलगाव येथील माजलगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक ओमप्रकाश माने यांच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या १५० मोर्चेकर्यांवर गुन्हा गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील मोर्चा विनापरवाना काढून ग्रामीण ठाण्याच्या आवारात प्रवेश करुन माने यांच्या विरुद्ध अपशब्द वापरल्याचे नमूद आहे़ (वार्ताहर) ही तर पोलीसांची मनमानी सर्वसामान्य माणसाला कायद्याचा धाक दाखवून पोलीस मनमानी करत असतील तर त्याविरूद्ध दादही मागायची नाही का? असा सवाल भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभिषण थावरे यांनी उपस्थित केला. पोलीसांनी मनमानी कारभार चालविला असून जाणीवपूर्वक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप त्यांनी केला. याबाबत पोलीस महासंचालक व औरंगाबाद परीक्षेत्राचे महानिरीक्षक यांच्याकडे दाद मागू असे ते म्हणाले.
माजलगावात दीडशे मोर्चेकर्यांवर गुन्हा
By admin | Updated: May 16, 2014 00:13 IST