राजेश खराडे बीडपोषक वातावरण व मुबलक पाणीसाठ्यामुळे कालपर्यंत रबी हंगामातील पिके जोमात होती. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबीतील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा, द्राक्षांच्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अवकाळीचा तडाखा तब्बल १२ हजार हेक्टरावरील पिकांना बसला असून, उत्पादनाबाबत शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.खरिपाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीच्याजोरावर शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून ज्वारी, बाजरी या प्रमुख पिकांसह गहू, करडई, जवस या पिकांवरही भर दिला होता. मुबलक प्रमाणात पाणीसाठा आणि मशागतीच्या जोरावर सर्वच पिके जोमात होती. रबीच्या अंतिम टप्प्याात गहू, ज्वारीची काढणी करून पिके शेतातच असताना झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारी काळवंडण्याचा धोका निर्माण झाला असून आंब्याचा मोहर गळाला आहे. शिवाय, खरबूज पाण्यात भिजल्याने नासू लागले आहेत. रबी हंगामात हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिसकावला आहे. बुधवारी जिल्ह्यात ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यात १०.४५, पाटोदा १०.००, अंबाजोगाई २.२०, माजलगाव १.५०, केज १५.७१, धारूर १०.६७, परळी १०.०० अशी नोंद आहे. मंडळानुसार पावसामध्ये तफावत असली तरी वादळी वाऱ्याने ज्वारीची पडझड झाली आहे. फळबागांमध्ये आंबा व द्राक्षांच्या बागा कोलमडल्या आहे. धारूर तालुक्यातील २८ गावशिवारातील १३४० हेक्टर, केज तालुक्यातील ३५०० हेक्टर, परळी तालुक्यातील ५००० हेक्टर असे जिल्हाभरातील जवळपास १५ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही- खोतपरळी: एका दिवसाच्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता पाहून बुधवारी रात्रीच पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. परळी तालुक्यातील कौठाळी येथील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी रात्री भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, तहसीलदार विद्याचरण कडवकर, तलाठी, कृषी अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.
अवकाळीने धूळधाण
By admin | Updated: March 17, 2017 00:22 IST