मानवत : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंबंधी परभणी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर आहेत. मात्र नगर पालिकेतील अत्यावश्यक सेवा व कर्मचारी या संपातून वगळले आहेत. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यासंबंधी अनेक वेळा शासनास निवेदने दिली आहेत. मात्र त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. यामुळे परभणी मनपा व जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, पूर्णा व सोनपेठमधील नगर पालिका कर्मचारी, कामगार नेते के. के. आंधळे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर गेले आहेत. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नगर पालिका व महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे, १० मार्च १९९३ नंतरच्या रोजंदारी कर्मचाऱ्यास विनाअट कायम सेवेत सामावून घ्यावे, अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घ्यावेत, १२ व २४ वर्षाची कालबद्ध पदोन्नती कर्मचाऱ्यांना लागू करावी, नगर पालिका संवर्गात अतिरीक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित पदस्थापना द्यावी, नगर पालिकांचे थकीत सहाय्यक अनुदान त्वरित वितरित करावे व कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा करण्यात यावे या मागण्यांसाठी हा संप करण्यात आला असून मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मानवत नगरपालिकेचे अध्यक्ष रमेश बारहाते, के. के. आंधळे, आनंद मोरे, अय्युब खान, सुनीता आहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
न.प. कर्मचारी बेदमुत संपावर
By admin | Updated: July 17, 2014 00:26 IST