औरंगाबाद : मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यातील लघु प्रकल्पांमधील पाण्याची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. विभागातील सर्व लघु प्रकल्पांमध्ये मिळून सरासरी अवघा ३ टक्केच उपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. नांदेड, औरंगाबाद आणि परभणी वगळता उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये तर लघु प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा एक टक्क्यापेक्षाही कमी पाणीसाठा आहे.विभागातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर तर लहान लहान बंधारे आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ७२९ लघु प्रकल्प आहेत. सर्वाधिक १९९ प्रकल्प हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. मात्र आज याच जिल्ह्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. जिल्ह्यातील या लघु प्रकल्पांमध्ये अवघे एक टक्काही पाणी राहिले नाही. विभागातील सर्व लघु प्रकल्पांची एकूण क्षमता १५९५ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात या सर्व प्रकल्पांमध्ये आजघडीला ४९ दलघमी इतकाच पाणीसाठा उरला आहे. हे प्रमाण केवळ ३ टक्के इतके आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याचे टँकर भरण्यासाठीही पाणी शिल्लक राहिलेले नाही. परिणामी पाणीटंचाई आणखी भीषण होत चालली आहे. उर्वरित सहा जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यांमधील प्रकल्पांची स्थिती काहींशी बरी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ९ टक्के पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातही लघु प्रकल्पांमध्ये जवळपास एवढाच म्हणजे ९ टक्के पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यात हे प्रमाण ४ टक्के आहे. लातूर, जालना, बीड, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रकल्प मात्र पूर्णपणे कोरडे पडले आहेत.
आता टँकर भरण्याचेही वांधे
By admin | Updated: March 28, 2016 00:03 IST