औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू शोध समितीकडे मुलाखती दिलेल्या देशभरातील २७ प्राध्यापकांपैकी पाच जणांना राज्यपालांकडून बोलाविण्यात येणार आहे. समितीने पाच जणांची नावे असलेला बंद लिफाफा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे मुलाखत दिलेल्या सर्व उमेदवारांनी आता राज्यपालांकडून कधी बोलावणे येते, याची प्रतीक्षा सुरू केली आहे. अधिक माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे हे २८ मार्च रोजी निवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नवीन कुलगुरूंची निवड करण्यासाठी राज्यपालांनी जानेवारीमध्ये कुलगुरू शोध समिती स्थापन केली होती. त्यानंतर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. प्राप्त ६५ अर्जांपैकी २९ जणांना २९ मे रोजी मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. २९ मे रोजी मुंबई विद्यापीठातील कलिना सभागृहात शोध समितीने २७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये औरंगाबादेतील सात प्राध्यापकांचा समावेश आहे. समितीने कुलगुरुपदासाठी योग्य वाटलेल्या पाच जणांची नावे राज्यपालांना गुरुवारी रात्रीच कळविली. गुरुवारी जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिपदाचा शपथविधी झाला. या शपथविधीमुळे राज्यपाल के. शंकरनारायण व्यग्र होते. शुक्रवारी ते पाच उमेदवारांशी संवाद साधतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे तेथे मुलाखतीसाठी गेलेले सर्व उमेदवार मुंबईतच होते. शुक्रवारी दिवसभर कोणत्याही उमेदवारास राजभवानातून बोलावणे आले नाही. त्यामुळे आता गावी परतावे अथवा नाही, या संभ्रमावस्थेत उमेदवार सापडले. त्यामुळे अनेकांनी राज्यपालांकडून पाच जणांना बोलवणे येईपर्यंत मुंबईतच मुक्कामी राहण्याचे ठरविल्याचे सूत्राने सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू शोध समितीने २७ उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पाच जणांची नावे राज्यपालांना कळविली आहेत.कुलगुरू निवडीचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात असल्याने विद्यापीठातील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांपासून ते विविध विभागप्रमुखांचे लक्ष राज्यपालांच्या निर्णयाकडे लागले आहे. विद्यापीठाला भूमिपुत्र कुलगुरू मिळतो किंवा बाहेरचा यावर जोरदार चर्चा केली जात आहे.
आता प्रतीक्ष़ा ‘त्या’ कॉलची
By admin | Updated: May 31, 2014 01:25 IST