गंगाराम आढाव , जालनाकेंद्र सरकारच्या राष्ट्रीय भूमी आधुनिकीकरण कार्यक्रमात तलाठ्यांचा हस्तलिखित सातबारा, फेरफार मंजूर, नामंजूच्या नोंदी संगणकावर घेऊन आॅनलाईन करण्यासाठी डेटा गोळा करण्याचे काम जालना तहसीलमध्ये जोरात सुरू आहे. यासाठी सर्व तलाठी कामाला लागले असून दोन दिवसांत शंभर टक्के काम पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.केंद्र सरकारने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. एकुण १४४ गावांच्या नोंदी अद्यावत करण्यात येत आहे. हे काम करताना हस्तलिखित सातबारा आणि संगणकीकृत सातबाराचा स्टेट डेटा अपलोड करण्यापूर्वी तंतोतंत जुळला आहे का ? याची तसेच चुका होऊ न देण्याची खबरदारी घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना तहसीलने संगणकीकृत सातबाराचे काम यापूर्वीच पूर्ण केलेले आहे. संगणकीकृत सातबारासह फेरफारचे काम अधिक सुलभ व्हावे म्हणून सर्व डाटा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आता फेरफारही आॅनलाईन मिळणार आहे. जमिनीची रजिस्ट्री झाली की, लगेचच फेफार होणार आहे. त्यासाठी तलाठ्यांकडे जाण्याची गरज संबंधितांना भासणार नाही. तसेच सर्व तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आलेले असून त्याद्वारे हे काम होणार आहे. हस्तलिखित नोंदीचे संगणकीकृत डाटा गोळा करण्याचे ९९ टक्के झाले आहे.त्यानंतर डाटा सिडी तयार करून त्याचे व्हेरिफीकेशन झाल्यानंतर अंतिम डाटा सीडी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती तहसीलदार रेवणनाथ लबडे यांनी दिली.
आता सातबाऱ्याचा फेरफार होणार आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 23:07 IST