लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तेल कंपन्यांनी खुल्या बाजारात फ्री सेल केरोसीन आणि पाच किलोचे गॅस सिलिंडर उपलब्ध करुन दिले असून, त्याचे वितरण जिल्ह्यातील रेशन दुकानांतून होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा इंधनाचा प्रश्न मिटणार आहे.जिल्ह्यात नागरिकांना स्वयंपाक व दिवाबत्तीसाठी केरोसीन उपलब्ध होत आहे. परंतु, इतर वापरांसाठी केरोसीन मिळत नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा दराने केरोसीनची विक्री होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. यावर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच अनुदानित केरोसीनवरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने रेशन दुकानातून फ्री सेल केरोसिन आणि ५ किलोचे सिलिंडर वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने ७ सप्टेंबर रोजी घेतला आहे. तसा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.जिल्ह्यातील रेशन दुकान व परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांकडून आता केरोसिन आणि पाच किलो वजनाचे लहान सिलेंडर सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, मानवत, परभणी, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ या सात तालुक्याच्या ठिकाणी त्यासाठी वितरकांची नेमणूकही करण्यात आली आहे.जिल्ह्यात स्वयंपाकासाठी इंधन म्हणून निळे रॉकेल परवानाधारक विक्रेत्यांकडून दिले जाते. मात्र, या रॉकेलचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याने स्वयंपाकासाठी इंधनाचा प्रश्न निर्माण होत असे. या निर्णयामुळे रॉकेल आणि सिलिंडरचा प्रश्न निकाली निघाला आहे.
आता रेशन दुकानांतून मिळणार मिनी सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:38 IST