---
कोरोना प्रादुर्भावात रक्तसंकलन ३० टक्क्यांपर्यंत घटले होते. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमामुळे हा तुटवडा भरून निघण्यास मोलाची मदत होत आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे ३ ते ४ जणांचा जीव वाचतो. संकलित होणाऱ्या रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नाही.
--------
विभागीय रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा कार्यभार असून, शासकीय आणि खाजगी अशा १७ रक्तपेढ्या आहेत. रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या औषधींसह अनेक गोष्टी कारखान्यात तयार होतात. परंतु आजही रक्त कोणत्या कारखान्यात तयार होत नाही. रक्तदान केल्याशिवाय गरजू रुग्णांना रक्त मिळू शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला अधिक महत्त्व आहे. परंतु रक्तदान म्हटले की, सुटीच्या दिवशी करू, वेळ मिळाला तर करू असे म्हटले जाते. पण जेव्हा स्वत:ला, नातेवाईकांना रक्ताची गरज भासते, तेव्हा रक्ताचे महत्त्व व्यक्तीला कळते.
रक्तसंकलन केल्यानंतर ते ३० ते ३५ दिवस साठविता येते. रक्ताची मुदतबाह्य होण्याची तारीख जवळ आली की ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे ते पोहोचविले जाते. शासकीय रक्तपेढ्यांसाठी रक्तदान करण्याकडे ओढा अधिक दिसतो. परंतु प्रत्येक रुग्ण हा शासकीय रुग्णालयातच दाखल होतो असे नाही. खाजगी रुग्णालयांतही रुग्ण दाखल होतात. तेथेही रक्ताची गरज भासते. खाजगी रक्तपेढ्यांना ‘एसबीटीसी’ने निश्चित केलेल्या दरानुसारच रक्त द्यावे लागते. शहरात रक्तपेढ्या आहेत. तर ग्रामीण भागात ६ शासकीय रक्त संकलन केंद्रे आहेत. ग्रामीण भागात रक्ताच्या गरजेसंदर्भात या केंद्रांना आधी माहिती द्यावी लागते. त्यानंतर रक्त उपलब्ध करून दिले जाते. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी अधिक लोकसंख्या आहे, तेथे रक्तपेढी सुरु करण्यासाठी संस्थांनी पुढे आले पाहिजे.