लातूर : केंद्र शासन संसद, विधि मंडळ, रिझर्व्ह बँक व जनता यापैकी कोणासही जुमानत नाही. बहुमत असल्याने एका व्यक्तीची हुकूमशाही चालू आहे. नोटाबंदीचा निर्णय एक फ्रॉडच आहे. एकाधिकारशाहीमुळे कोणतेही जनहिताचे निर्णय घेतले जात नाहीत. जनताद्रोहीच निर्णय राबविले जात आहेत, असा आरोप बँक कर्मचारी संघटनेने करीत मंगळवारी हैदराबाद बँकेपर्यंत मोर्चा काढला.बँक आॅफ महाराष्ट्रा येथून बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोर्चाला प्रारंभ केला. मिनी मार्केट, हनुमान चौक, गुळ मार्केट, स्टेट बँक आॅफ हैदराबाद येथे मोर्चा आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. स्टेट बँक विलिनीकरणाचा निर्णय घातक असून, हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्टेट बँक विलिनीकरणानंतर अन्य बँकांच्या विलिनीकरणाचा रेटा वाढणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप करून मोर्चा काढला. ‘मी म्हणेल ती पूर्व दिशा’ असे धोरण केंद्र शासनाचे आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाला इतर कोणी आव्हान दिले नसले, तरी बँक कर्मचारी संघटनांनी हे आव्हान स्वीकारले आहे. कामगार कायदे भांडवलदार धार्जिणे बनविले जात आहेत. या धोरणाविरुद्ध युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनचा तीव्र विरोध राहणार असल्याचे प्रशांत धामणगावकर म्हणाले.आंदोलनात उमेश कामशेट्टी, उत्तम होळीकर, दीपक माने, उदय मोरे, राजेंद्र दरेकर, पवन मोटे, किशोर चंदन, नारायणकर, इबितवाड, सरस्वती हेड्डा, मेघा मयुरी, भावना पटेल, प्रतिमा जगताप, बाळकृष्ण धायगुडे यांच्यासह दोनशे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
नोटाबंदी फ्रॉड; बँक कर्मचाऱ्यांचा आरोप
By admin | Updated: March 1, 2017 01:13 IST