औरंगाबाद : गायब झालेली झेरॉक्स मशीन योजनेतील अपंग लाभार्थ्यांची यादी समाजकल्याण विभागाला बुधवारी अचानक सापडली; परंतु आता झेरॉक्स मशीनची जुनी शासकीय दर सूची (आर.सी.) रद्द झाली असून, नवी दर सूची शासनाकडून प्राप्त झाल्यावर ही योजना मार्गी लागणार आहे. टिनपत्रे व सायकल योजनेचे टेंडर यापूर्वीच झालेले असले तरी समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीसाठी ते थांबल्याची माहिती सभापती शीला विजय चव्हाण यांनी दिली. निधी उपलब्ध असतानाही योजना राबविण्यात समाजकल्याण विभागाचे कारभारी व प्रशासन अयशस्वी ठरले. आता गेल्यावर्षीच्या दर सूची (आर.सी.) बदलल्यामुळे नव्या दर सूची प्राप्त होईपर्यंत या योजना पुन्हा लांबवणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सभापती चव्हाण यांनी सांगितले की, अपंगांसाठीच्या झेरॉक्स मशीन योजनेत जुन्याच यादीतील लाभार्थ्यांना लाभ दिले जाणार आहेत. ही योजना लवकर मार्गी लागावी, असे आमचे प्रयत्न आहेत; परंतु आता त्यात दर सूचीची अडचण समोर आली आहे. जुने रेट कॉन्ट्रॅक्ट बदलले आहे. नवे दर येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे; परंतु त्यासाठी जास्त दिवस थांबण्याची गरज पडणार नाही. याचप्रमाणे सायकल व टिनपत्रे योजनेची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे; परंतु समाजकल्याण अधिकारी बदलल्यामुळे टेंडर अद्याप उघडलेले नाहीत. ही ई-टेंडर प्रक्रिया असल्यामुळे समाजकल्याण अधिकाऱ्याची अधिकृत डिजिटल स्वाक्षरी असल्याशिवाय हे टेंडर उघडता येत नाही. प्रभारी समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे यांची डिजिटल स्वाक्षरी प्राधिकृत झाली की ही प्रक्रिया सुरू होईल.
झेरॉक्स मशीन दर सूचीत अन टिनपत्रे, सायकली लटकल्या टेंडरमध्ये
By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST