औरंगाबाद : चिखलठाणा येथील महापालिकेच्या मेल्ट्रोन रुग्णालयात रविवारी सकाळी पाणी नसल्यामुळे संतप्त कोरोना रुग्णांनी अक्षरशः रुग्णालय डोक्यावर घेतले. याचवेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये नाष्ट्यात दिलेला भात शिळा होता. त्यामुळे रुग्णांनी गोंधळ घातला. मनपाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने त्वरित दुसरा नाष्टा दिला.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दररोज नवीन सेंटर उघडण्याची वेळ महापालिकेवर येत आहे. आठ दिवसांपूर्वीच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले. दोन इमारतींमध्ये कोरोनाचे २५० रुग्ण आहेत. रविवारी सकाळी मनपाच्या कंत्राटदाराने नाष्टा दिला. त्यात फोडणीचा भात होता. परंतु हा भात शिळा असल्याची तक्रार काही रुग्णांनी केली. त्यानंतर थोड्याच वेळात पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील रुग्ण तळमजल्यात जमा झाले. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या प्रकारानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी पुरवठादाराला बोलावून घेतले. लालाजीच या पुरवठादार एजन्सीच्या प्रतिनिधीने तातडीने येऊन रुग्णांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हा भात ताजाच असून तो चार कोविड केअर सेंटरमध्ये पुरविला आहे, अन्य कोणत्याही केंद्रावरून तक्रार आलेली नाही, असे सांगितले. परंतु रुग्ण तक्रारीवर ठाम होते. कंत्राटदाराने दुसरा नाष्टा दिला. त्यानंतर गोंधळ थांबला.
मेल्ट्रोनमध्ये पाण्याची टाकी फुटलीमेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये पाण्याची टाकी फुटल्यामुळे सकाळी रुग्णांना अंघोळ करण्यासाठी पाणी नव्हते. बराच वेळ पाणी येत नसल्यामुळे रुग्ण संतप्त झाले. रुग्णांचा गोंधळ वाढत गेल्याने महापालिकेने पर्यायी व्यवस्था करण्याचे काम सुरू केले. दुपारपर्यंत टँकरद्वारे पाणी आणणे सुरू होते.
दारूच्या बाटल्या येतात कोठून?कोविड सेंटरमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वाद होत आहेत. या ठिकाणी काही रुग्ण बाहेरून डबा मागविण्याच्या नावाखाली दारूही मागवत आहेत. त्याला आक्षेप घेतला तर कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला जात आहे. या प्रकारांमुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात पत्र देऊन, पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.