सोयगाव तहसील कार्यालयात कोणतेही काम करण्यासाठी आलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केल्याबाबतचे प्रमाणपत्र आणावे. जर असे प्रमाणपत्र नसेल तर शासकीय कामासाठी कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
सोयगाव तालुक्यातील लसीकरण अधिक गतिमान करण्यासाठी तहसीलदारांनी हा निर्णय घेतला आहे. तालुका आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात थेट गावस्तरावर कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. परंतु ग्रामीण भागातील नागरिक या लसीकरणाकडे पाठ फिरवित असल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तहसील कार्यालयात कोणत्याही शासकीय कामासाठी आल्यावर आधी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवा. तरच काम केले जाईल, असे फर्मान काढले.
असे म्हटले आदेशात
या नियमाच्या अंमलबजावणीसाठी तहसील कार्यालयात ४५ वर्षांवरील कोणताही व्यक्ती शासकीय कामासाठी आल्यास त्याची लसीकरण केल्याबाबत प्रवेशद्वारावर चौकशी करण्यात येईल.
त्या व्यक्तीच्या कुटुंबातील ४५ ते ६० व त्यापेक्षा जास्त वयाच्या सदस्यांनी लसीकरण केले आहे किंवा नाही याबाबतची चौकशी करण्यात येईल.
सर्वच ठिकाणी हा नियम लागू करणार
तहसील कार्यालयात लसीकरणाबात ही नियमावली लावली आहे. तर येत्या काळात सर्वच कार्यालयात लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात येणार आहे. या नियमामुळे लोक कोरोना लसीकरण करून घेतील, अशी अपेक्षा आहे. असे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.