औरंगाबाद : स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला मी कधीही पाठिंबा दिला नव्हता, असा स्पष्ट खुलासा आज पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला. दुपारी त्या पत्रकारांशी वार्तालाप करीत होत्या. महिला आयोग तुमच्या दारी अंतर्गत राज्यातील सहा विभागांच्या जनसुनवाईचे कार्यक्रम त्यांनी यावेळी जाहीर केले. औरंगाबादला ३० एप्रिल रोजी सकाळी १० वा. विभागीय आयुक्त कार्यालयात ही सुनावणी होईल. दरम्यान दि. २९ एप्रिल रोजी सकाळी १० वा. विभागीय कार्यशाळा होईल. मौलाना आझाद संशोधन केंद्रात होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते होईल. स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला पाठिंबा दिल्याबद्दल नाशिक येथे रहाटकर यांचा कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळला होता व त्यावर बरेच वातावरण तापले होते. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा मिळालाच पाहिजे. मंदिर वा अन्य प्रार्थनास्थळांच्या बाबतीतही माझी हीच भूमिका आहे. रा.स्व. संघातही स्त्रियांचा योग्य मान राखला जातो, असे त्या आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या. गणेश पांडे प्रकरण बरेच गाजले. सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही झाला. आता या प्रकरणाचा तपास राज्य महिला आयोग करीत आहे, खरोखरच यात पीडितेला न्याय मिळणार का असा सवाल विचारता, विजया रहाटकर एवढेच म्हणाल्या की, या प्रकरणाचा तपास महिला आयोग करीत आहे. लवकरच तपास पूर्ण होईल व तो नि:पक्षपाती राहील.
‘स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला पाठिंबा दिला नाही’
By admin | Updated: April 28, 2016 23:51 IST