औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला तरी त्याची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही, अशी बेताल उत्तरे मनपा अधिकाऱ्यांनी महापौर कला ओझा, पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीला आयुक्त पी.एम. महाजन यांची उपस्थिती होती.अधिकाऱ्यांना आता पाणीपुरवठ्याच्या कटकटीतून मुक्तता मिळाल्यासारखे वाटत आहे, तर समांतरची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीही (एसीडब्ल्यूयूसीएल) बेजबाबदारपणे वागू लागली आहे. पाणी न आल्यास जबाबदार कोण? यासाठी कंपनीने अधिकारी, अभियंते, लाईनमनची नावे जाहीर केलेली नाहीत, तर पालिका प्रशासनानेदेखील त्यांना या प्रकरणी विचारणा केलेली नाही. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबी पाण्यासाठी परवड येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे काम १ सप्टेंबरपासून एसीडब्ल्यूयूसीएल करीत आहे. १३ दिवसांमध्ये कंपनीच्या विरोधात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींबाबत पालिका अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कुणाकडे तक्रार करावी आणि जबाबदार म्हणून कुणाला विचारावे हे कळण्यास मार्ग नाही. १३ दिवसांतच हा अनुभव आहे, तर कंपनी २० वर्षे काम कसे करणार आणि औरंगाबादकरांना त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागणार हे आत्ताच कसे कळणार? सभापती विजय वाघचौरे हे अधिकाऱ्यांची बेताल उत्तरे ऐकून संतापले. ते म्हणाले की, मनपाने योजनेचे खाजगीकरण केले आहे. पूर्ण पालिकेचे नाही. शहरातील सर्वसामान्यांना पाणीपुरवठ्याप्रकरणी ज्या अडचणी येतील त्याचे निरसन अधिकाऱ्यांना करावेच लागेल. प्रभागनिहाय प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी दिलीच पाहिजे. कंपनीच्या अरेरावीपुढे नागरिक हतबल झाले, तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील. अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. प्रभागनिहाय पाणीपुरवठा दक्षता समिती गठीत करण्याची त्यांनी मागणी केली. आयुक्त महाजन म्हणाले की, करारात जे नमूद असेल, त्याप्रमाणे कंपनीकडून काम करून घेतले जाईल.गुंठेवारीतील टँकर आणि जनकल्याण म्हणून पाठविण्यात येणारे मोफत टँकर्स ठेकेदाराने बंद केले. सिडको-हडको, उल्कानगरी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली. एन-७ जलकुंभावर मिसारवाडीतील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. उल्कानगरी, जवाहर कॉलनीतील नागरिकांनी पाण्यासाठी उपमहापौरांना निवेदन दिले. शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा कोलमडला.