उमरगा : येथील शासकीय वसतिगृहात पुरेशे व मेन्यूप्रमाणे जेवण दिले जात नाही. शिवाय राहण्यासाठी जागाही अपुरी आहे, अशा अनेक समस्या येथे राहणाऱ्या विद्यार्थिनींनी सोमवारी आ. ज्ञानराज चौगुले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी या अधिकारी, लोकपमतिनिधींनी तात्काळ या तक्रारींच्या अनुषंगाने पंचनामाही केला.या वसतिगृहात राहणाऱ्या गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळे सोमवारी आ. चौगुले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी येथे भेट दिल्यानंतर या मुलींनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचून त्यांना भांडावून सोडले. वसतिगृह अधीक्षक नेहमीच गैरहजर असतात. यासोबतच येथे मागील दोन महिन्यांपासून निर्वाह भत्ता मिळाला नसल्याचेही या मुलींचे म्हणणे आहे. वसतिगृहात राहण्यासाठी जागा अत्यंत अपुरी पडत असल्याने अनेक गैरसोर्इंचा सामना करावा लागत असून, येथे शासनाने ठरवून दिलेल्या मेन्युप्रमाणे व पोटभर जेवणही मिळत नसल्याची गंभीर तक्रार या मुलींनी यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावर आ. चौगुले व इतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला असता यातील अनेक बाबींमध्ये सत्य असल्याचे आढळून आले. तसेच येथील हजेरीपटात चुका असल्याचे वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे आदी बाबीही त्यांच्या निदर्शनास आल्या. यावेळी नगराध्यक्षा केवलबाई औरादे, नगरसेविका सुमनताई भोवरे, गटविकास अधिकारी बी. बी. खंडागळे, गटशिक्षण अधिकारी व्ही. जी. राठोड, शिक्षण विस्ताराधिकारी पी. एम. माळी, एस. बी. बिराजदार, केंद्र प्रमुख बी. एम. चव्हाण आदी उपस्थित होते.
ना पोटभर जेवण, ना पुरेशी जागा
By admin | Updated: February 10, 2015 00:30 IST