नांदेड : येत्या ११ आॅक्टोबरला नांदेड - वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर व्ही.व्ही.पी.ए.टी. (वोटर व्हेरीफाईड पेपर आॅडिट ट्रेल) या यंत्राचा वापर करण्यात येणार असून यासाठी घ्यावयाच्या ३५० यंत्रासाठी राज्य शासनाने ९२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काही व्यक्तींनी तसेच राजकीय पक्षांनीही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या कार्यप्रणालीबाबत संशय व्यक्त केला होता. याबरोबरच काहींनी याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल केल्या होत्या. अशा प्रकारच्या तक्रारी मागील काही वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांबाबत सातत्याने येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगास यापुढील लोकसभा, विधानसभेसह इतर निवडणुकांत टप्याटप्प्याने वोटर व्हेरीफाईड पेपर आॅडिट ट्रेल यंत्रणा वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या वतीने नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी प्रथमच या यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी मे.ईलेक्ट्रॉनिक कॉ.आॅफ इंडिया यांच्याकडून ३०० मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी आवश्यक असलेल्या ९२ लाखांच्या खर्चास शुक्रवारी राज्य शासनाने मान्यता दिली़ सध्या यंत्रासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला असला तरी यानंतर या यंत्राचा नियमित वापर होत असल्यास त्याकरिता होणारा खर्च संबंधित महानगरपालिकेकडून घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मनपा मतदानासाठी ३५० यंत्र वापरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:42 IST