लोकमत न्यूज नेटवर्क जिंतूर : येथील तूर खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या १८ हजार ६०३ क्विंटल तुरीची जवळपास ९ कोटी ३९ लाख रुपयांची देयके थकली आहेत. तूर विक्री करूनही रक्कम हाती पडत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जिंतूर येथील बाजार समितीच्या वतीने नाफेडमार्फत शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. खुल्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने तुरीची खरेदी केली जात असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर गर्दी केली होती. एक एक महिना रांगेत थांबल्यानंतर तूर विक्री होत होती. २० जानेवारी ते २२ एप्रिलदरम्यान १८ हजार १२३ क्विटंलची खरेदी हमीभाव केंद्रावर करण्यात आली. या तुरीचे ९ कोटी १५ लाख ३१ हजार १५० रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर ३० एप्रिल ते १० जूनपर्यंत जवळपास दीड हजार शेतकऱ्यांनी १८ हजार ६०३ क्विंटल तुरीची विक्री केली. या कालावधीत विक्री केलेल्या तुरीची ९ कोटी ३९ लाख ४५ हजार १५० रुपयांची देयके अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
तूर उत्पादकांचे नऊ कोटी थकले
By admin | Updated: June 30, 2017 23:45 IST